तालुक्यातील सदलगा शहरात एका विहिरीमध्ये सुमारे ३० मगरींची पिल्ले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच, नगरपालिकेचे माजी अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी १५ मगरींची पिल्ले पकडून वन विभागाकडे सुपूर्द करत आपले सामाजिक भान दाखवून दिले. सदलगा शहरात दूधगंगा नदीच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत गेल्या सहा महिन्यांपासून १२ फुटांची एक मोठी मगर राहत होती. याच मगरीने सुमारे ३० हून अधिक पिल्लांना जन्म दिला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तात्काळ वन विभागाला याबद्दल माहिती दिली.

मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगर पकडण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यानंतर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वतः विहिरीत उतरून, साप पकडण्याच्या विशेष यंत्राच्या मदतीने १५ मगरींची पिल्ले पकडली. त्यांनी ही पिल्ले वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून आपल्या सामाजिक कार्याची प्रचिती दिली. या घटनेमुळे सदलगा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी, स्थानिक प्रशासनाने केलेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Recent Comments