Khanapur

बेळगावच्या डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांचा माणुसकीचा आदर्श; विद्यार्थिनींना सायकल भेट

Share

खानापूर तालुक्यातील दुर्गम, जंगलव्याप्त भागातील मुलांना शाळेत जाणे हे एक मोठे आव्हान आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना दररोज अनेक किलोमीटर पायपीट करून शिक्षणासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. हि बाब लक्षात घेऊन बेळगावच्या डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांनी येथील विद्यार्थ्यांना सायकल वितरित केल्या. बेळगावच्या डीडीपीआय लीलावती हिरेमठ खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सरकारी मुलींच्या शाळेला भेट देण्यासाठी जात असताना त्यांनी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन विद्यार्थिनींना पाहिले. चौकशीअंती लीलावती हिरेमठ यांना समजले की, या विद्यार्थिनी दररोज तेरेगाळी गावातून शिरोलीपर्यंत तब्बल ४ किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत येतात. त्यांची ही गैरसोय लक्षात येताच, हिरेमठ यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी सीआरपी बी.ए. देसाई यांना दहा हजार रुपये देऊन सायकल खरेदी करण्यास सांगितले आणि त्या विद्यार्थिनींना त्वरित वितरित केल्या.

जिल्हास्तरीय अधिकारी असूनही, शालेय विद्यार्थिनींची अडचण स्वतःहून ओळखून, त्यांना स्वतःच्या खर्चाने शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. या दोन्ही विद्यार्थिनी आता दररोज वेळेवर सायकलने शाळेत पोहोचू शकतात. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या या सहकार्यामुळे त्या विद्यार्थिनी प्रचंड आनंदी झाल्या असून, त्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांच्या या कार्याची जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा होत आहे. त्यांचे हे कार्य इतर अधिकाऱ्यांसाठीही एक उत्तम आदर्श ठरले आहे.

Tags: