Belagavi

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

Share

संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षीय भेद विसरून भाषेच्या मुद्द्यावर सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी व्यक्त केले.

आज बेळगावच्या सीमालढ्यात हुतात्मा झालेल्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात हुतात्मा दिन साजरा करत अभिवादन करण्यात आले. सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मरण करून मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी नमूद केले की, जरी पक्ष वेगळे असले तरी भाषेच्या मुद्द्यावर सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येऊन संघर्ष करणे महत्त्वाचे आहे. भाषिक अन्यायाविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे आणि प्रत्येकाच्या मनात संघर्षाची ज्वाला तेवत राहिली पाहिजे. कायदेशीर लढ्यालाही सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी महापौर रेणू किल्लेकर यांनीही आपले विचार व्यक्त करत महाराष्ट्र सरकारने सीमेवरील लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची गरज असल्याचे म्हटले. मराठी भाषिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेतले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, दिगंबर पाटील, रमाकांत कोंडूस्कर, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, राजकुमार बोकडे, रणजीत चव्हाण पाटील, मुरलीधर पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी जि.प. सदस्या सरस्वती पाटील, सतीश पाटील, अमर येळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, ॲड. बिर्जे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: