Hukkeri

पत्रकारांनी जनतेला सत्य सांगावे: राहुल जारकीहोळी

Share

पत्रकार अनेक समस्या आणि आव्हानांना सामोरे जात असले तरी, लोकशाहीच्या यशात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी जनतेला सत्य परिस्थितीची माहिती द्यावी, असे प्रतिपादन केपीसीसी युवा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल जारकीहोळी यांनी केले.

हुक्केरी शहरात कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाच्या बेळगाव शाखेच्या वतीने आयोजित प्रतिभावंत पुरस्कार आणि अभिनंदन समारंभात ते बोलत होते. येथील एस.एस. कन्व्हेन्शन हॉलमध्ये गुरुवारी कर्नाटक कार्यनिरत पत्रकार संघ जिल्हा शाखा, गोकाक लक्ष्मी एज्युकेशन ट्रस्ट आणि कर्नाटक टाइम्स वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. राहुल जारकीहोळी यांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरंदवाडे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, जिल्ह्यात संघातर्फे सक्रिय आणि रचनात्मक उपक्रम राबवण्यात आले असून, सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यात आली आहे. कोरोनासह विविध आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांच्या समस्यांवर लक्ष देण्यात आले आहे. त्यांच्या मुलांसाठी क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.

यावेळी राज्यस्तरीय विविध पुरस्कारांनी सन्मानित जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच एसएसएलसी आणि पीयूसीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या पत्रकारांच्या पाल्यांना प्रतिभावंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

प्रमुख पाहुणे लक्ष्मी एज्युकेशन ट्रस्टचे सनत जारकीहोळी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रमातून उच्च ध्येय गाठून उज्ज्वल भविष्य घडवावे. त्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या पत्रकारांच्या मुलांना त्यांच्या संस्थेतर्फे मोफत शिक्षण देण्याची ग्वाही दिली.

यावेळी व्यासपीठावर व्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष सर्वोत्तम जारकीहोळी, नगरपरिषद अध्यक्ष इम्रान मोमीन, पत्रकार पुंडलिक बाळोजी, यल्लप्पा तळवार, मल्लिकार्जुन रेड्डी गोंदी, प्रसन्ना कुलकर्णी, अरुण पाटील, बी. प्रभाकर, शिवानंद तारिहाळ, रवी कांबळे, चेतन होळेप्पगोळ, बसवराज कोंडी, महादेव नायक, राजू बागलकोट, विश्वनाथ नायक, बी.बी. कोतेकर, विनय पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता जैन यांनी केले. मंजू हुडेद यांनी स्वागत केले. लीलावती राजपूत यांनी स्वागतगीत गायले. या प्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

Tags: