पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या यशस्वी कारवाईनंतर बेळगावमध्ये माजी सैनिकांनी जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.

भारतीय लष्कराने मंगळवारच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंधूर’ राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. या कारवाईत सुमारे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, ही कारवाई पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती.
या कारवाईचं देशभरात स्वागत केलं जात असून, बेळगावमधील माजी सैनिक संघटनेनेही भारत सरकारच्या या धाडसी निर्णयाचं समर्थन करत विजयोत्सव साजरा केला. शहरात साखर वाटून व घोषणांनी उत्साहात वातावरण गाजवण्यात आलं.
या वेळी बोलताना माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश पुजारी म्हणाले, पाकिस्तान अनेक वर्षांपासून भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांना समर्थन देत आहे. १९९० पासून सतत भारतात अशांती पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय लष्कराची क्षमता संपूर्ण जगाला माहिती आहे. आम्ही संयमी असलो, तरी वेळ आल्यास कठोर निर्णय घेण्याची ताकद भारतात आहे. पाकिस्तानने या कारवाईतून योग्य तो धडा घ्यावा.
ते पुढे म्हणाले की, पाक लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आपली कुटुंबं आधीच इतर देशांत हलवली आहेत, यावरून तिथे किती असुरक्षित वातावरण आहे हे स्पष्ट होते. भारताने ही कारवाई योग्य वेळ साधून केल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments