Belagavi

बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाला प्रारंभ

Share

बेळगावातील ऐतिहासिक आणि 106 वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या शिवजयंती उत्सवाला आज मोठ्या जल्लोषात आणि उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली. रायगडहून पदयात्रेने आणलेली शिवज्योत, युवक-युवतींचा उत्साह, आणि मंडळांचं समाजप्रबोधनात्मक कार्य अशा भारलेल्या वातावरणात यंदाच्या शिवजयंतीला विशेष स्वरूप दिलं आहे.

वैशाख शुक्ल द्वितीयेला परंपरेनुसार बेळगावमध्ये साजऱ्या होणाऱ्या, १०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून प्रथेप्रमाणे आज नरगुंदकर भावेंचौकात शिवजन्मोत्सवाने या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. रायगडहून पदयात्रेद्वारे शिवज्योत घेऊन आलेल्या शिवप्रेमींनी आज या उत्सवाचा शुभारंभ केला. युवाशिवप्रेमींच्या सहभागाने शिवज्योतीची मिरवणूक पार पडली.

बेळगावमधील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या मूर्तीला मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळासह विविध शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून, आरती करून जन्मोत्सव साजरा केला.

बेळगाव शहरात 1919 साली शिवजयंती उत्सव मंडळाची स्थापना झाली होती. सुरुवातीला मारुती गल्लीतील मारुती मंदिरात शिवजयंती साजरी होत असे. चव्हाट गल्ली, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली यांसारख्या 4-5 गल्लीतील मंडळांच्या माध्यमातून चित्ररथ मिरवणूक काढली जात असे. 1956 नंतर चित्ररथाची संख्या वाढली. शिवजयंतीसाठी सरकारकडून कोणतेही अनुदान न घेता केवळ जनतेच्या देणग्यांवरच हा उत्सव साजरा केला जातो, यंदा 1 मे रोजी शहरातील नरगुंदकर भावे चौकातून शिवजयंतीच्या ऐतिहासिक चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होईल अशी माहिती प्रकाश मरगाळे यांनी दिली.

श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर बोलताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी सजीव देखाव्यांच्या माध्यमातून चित्ररथ मिरवणूक आयोजित केली जाते. मंडळांनी केवळ देखाव्यासाठी नव्हे, तर समाजप्रबोधनाच्या हेतूने महाराजांचे विचार जनमानसात रुजवण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी रायगडहून शिवज्योत पदयात्रेद्वारे बेळगावमध्ये आणली. यंदा युवतींची संख्याही लक्षणीय होती. या सोहळ्यात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळासह विविध सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि असंख्य शिवभक्त सहभागी झाले होते.

Tags: