Belagavi

द्वितीय पीयूसी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा पंचायत सभागृहात गौरव

Share

द्वितीय पीयूसी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रशासन व डीडीपीयू विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बुधवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित या कार्यक्रमात, राज्य व जिल्हास्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात वाणिज्य विभागात तन्वी हेमंत पाटील हिने 597 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. कला विभागात महालक्ष्मी मन्जुनाथ कुसुगूर हिला 580 गुण, जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. विज्ञान विभागात सानिया अमजद सनदी व सृष्टी अनिल दिग्गावी यांनी प्रत्येकी 589 गुण मिळवले.

तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात वाणिज्य विभागात पूजा सुतार हिने 587 गुण, जिल्ह्यात प्रथम स्थान, कला विभागात कावेरी पवाडे मल्लापूर हिने 594 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक, विज्ञान विभागात अंकिता लगमण्णवर हिने 592 गुण, जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले, पीयूसी हा शिक्षणाचा टर्निंग पॉइंट आहे. शिक्षण ही अखंड प्रक्रिया असून, हाच अंतिम टप्पा नाही. यामुळे पुढील भवितव्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. आपण सगळे भविष्यात देशाचे तेजस्वी तारे बनाल, असे ते म्हणाले.

जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले, प्रत्येक क्षेत्रात मुलींची प्रगती स्तुत्य आहे. त्यामागे पालकांचे मोठे योगदान आहे. या यशाचा गर्व न ठेवता भविष्यात अधिक मेहनत घेऊन देशासाठी काम करा, असे ते म्हणाले.

जिपं सीईओ राहुल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, आज तुम्हाला सन्मानित केलं जातंय, पण उद्या याच व्यासपीठावर तुम्ही यशस्वी होऊन इतर विद्यार्थ्यांचा गौरव कराल. तुमचं यश इतरांसाठी प्रेरणा ठरावं.

कार्यक्रमात हिंदु मुस्लिम कल्याण विभागाचे आयुक्त अक्रम पाशा, पोलीस आयुक्त यडा मार्टिन, जिपं उपसचिव बसवराज हेग्गनायक, मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवतार, बेळगाव विभागाचे डीडीपीयू एम. एम. कांबळे, चिकोडी विभागाचे डीडीपीयू पी. आय. भंडारी व इतर शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: