Belagavi

बेळगाव विकासासाठी महापालिका, बुडा आणि स्मार्ट सिटी यंत्रणांची संयुक्त बैठक

Share

बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका, बुडा आणि स्मार्ट सिटी कंपनीने परस्पर सहकार्याने कार्य करण्याच्या सूचना आमदार अभय पाटील यांनी आजच्या संयुक्त बैठकीत दिल्या. बैठकीत अनेक प्रलंबित कामांवर चर्चा झाली असून अपूर्ण राहिलेल्या विकासकामांबाबत अधिकार्‍यांना चांगलाच जाब विचारण्यात आला.

बेळगाव महापालिकेच्या सभागृहात आमदार अभय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, बुडा आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आयुक्त शुभा बी., बुडा अध्यक्ष शकील अहमद, स्मार्ट सिटीच्या एमडी सईदा आफ्रीनाबानू बळ्ळारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

आमदार अभय पाटील यांनी विकासकामांमध्ये एकत्रितपणे काम न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रस्ते बांधणीसारख्या कामात एकमेकांवर जबाबदारी झटकून कामे रखडली जात असल्याचे ते म्हणाले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की वेगवेगळ्या संस्था एकमेकांप्रमाणे व्यवहार न करता, परस्पर सहकार्याने काम पूर्ण करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

शहरात बसवलेले पथदीप दुरुस्तीसंबंधी विचारले असता, संबंधित विभागाने वेळेवर माहिती न दिल्याने आमदारांनी अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले. वाहनधारकांमार्फत खांबांना धडक बसल्याने झालेले नुकसान आणि त्यावर कोणती कारवाई झाली याची माहिती विचारली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी जबाबदार अधिकार्‍यांना कारवाईचा इशारा दिला.

राणी चन्नम्मा नगर, शहापूर हरिजनवाडा, होसूर आचार्य गल्लीत विद्युत खांब बसवण्याच्या कामांतील विलंबाबाबत विचारणा करताना आमदारांनी ठेकेदारांवर नाराजी व्यक्त केली. ९ वेळा नोटीस दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ८३ लाख रुपयांचे बील थकित असल्याचे समजल्यावर आमदारांनी ठेकेदाराविरोधात तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.

या बैठकीत महापालिका, बुडा आणि स्मार्ट सिटी यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी हजेरी लावली होती.

Tags: