अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या सहकार्याने आयोजित ६वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य उत्साहात पार पडले. भाषेचे भावविश्वातील स्थान अधोरेखित करत, संमेलनाचे उद्घाटक उद्योगपती अप्पासाहेब गुरव यांनी मराठी भाषेचा भावनिक अर्थ विशद केला. संमेलनातील ग्रंथदिंडीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
भाषा ही केवळ शब्दांची नदी नसून, ती मानवतेची नदी आहे. तिला अखंड वाहू दिले पाहिजे. ती केवळ संवादाचे साधन नाही, तर भावनात्मक जगाचा अविभाज्य भाग आहे, अशा शब्दांत उद्योगपती अप्पासाहेब गुरव यांनी आपले विचार मांडले.

प्रारंभी अग्निशमन दलाच्या कार्यालयापासून शिनोळी बुद्रुकच्या मावळी भजन मंडळाच्या पारंपरिक गजराने ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. शिक्षणप्रेमी दीपक किल्लेकर, स्मिता किल्लेकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संमेलननगरीचे उद्घाटन, प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन झाले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सन्मानित संमेलन नगरीचे उद्घाटन वसुंधरा सोसायटीचे अध्यक्ष वाय. बी. चव्हाण यांच्या हस्ते झाले. पुस्तक गॅलरीचे उद्घाटन क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांच्या हस्ते झाले. भारतरत्न रतन टाटा सभागृहाचे उद्घाटन परिषदेचे कार्याध्यक्ष महादेव चौगुले यांनी केले. पॉलीहैड्रोन मंचाचे उद्घाटन नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर यांनी केले.

ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील हे या संमेलनाध्यक्षपदी होते. यावेळी बोलताना त्यांनी शब्दांवर प्रेम करा, शब्द तुमच्यावर प्रेम करतील आणि कीर्तीपर्यंत पोहोचवतील, असे प्रेरणादायी उद्गार व्यक्त केले. उत्तम साहित्यिक होण्यासाठी जन्मजात गुणापेक्षा सृजनशीलता व कष्ट अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. जात-धर्माच्या सीमांना मागे टाकत जे साहित्यनिर्मिती करतात, तेच खरे दिशादर्शक ठरतात, असेही ते म्हणाले.

संमेलनातील दुसऱ्या सत्रात डॉ. संजय कळमकर यांनी मराठी साहित्य, वाचन संस्कृती यावर विचार व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात मराठीचे सौंदर्य वाढविण्यासाठी पुस्तक वाचन काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच संमेलनाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात बेळगावच्या साहित्य संस्कृतीविषयी माहिती दिली. मेलनाच्या तिसऱ्या सत्रात ‘जागर लोकसंस्कृतीचा’ हा कार्यक्रम रंगला. यामध्ये शाहीर अभिजित कालेकर व सहकाऱ्यांनी रसिकांचे प्रबोधन केले.
या संमेलनप्रसंगी शिवाजीराव अतीवाडकर, बाळाराम पाटील, रमेश रेडकर, डॉ. शरद गोरे, नागेश मुच्चंडी, सुनील आपटेकर, बाळासाहेब काकतकर, महेश अनगोळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments