Belagavi

आंबेवाडीतील जमिनीच्या वादातून रॉडने मारहाण; सात जण जखमी

Share

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावात जमिनीच्या वादातून दोन भावांमध्ये गंभीर वाद झाला असून, या वादातून एकाने दुसऱ्याच्या घरात घुसून लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना आंबेवाडीतील लक्ष्मण राक्षे आणि गोविंद राक्षे या दोन भावांच्या कुटुंबांमध्ये २० गुंट्यांच्या जमिनीसंदर्भात सुरू असलेल्या वादातून घडली. याच वादातून आज अचानक लक्ष्मण राक्षे यांच्या बाजूने असणाऱ्या काही लोकांनी गोविंद राक्षे यांच्या घरी घुसून रॉडने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

या मारहाणीत गोविंद राक्षे यांच्या पायाची हाडं तुटली असून, सविता राक्षे, मारुती राक्षे यांच्यासह एकूण सात जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना काकती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. जमिनीच्या मालकीसंबंधी वादातून हिंसक प्रकार घडल्याने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Tags: