डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांची निपाणी शहराला दिलेल्या ऐतिहासिक भेटीस 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, एप्रिल 15 रोजी निपाणी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी मंत्री एन. महेश यांनी दिली.

निपाणीतील हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला योग्य तो मान मिळावा या उद्देशाने आमदार शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एप्रिल 11 ते 15 दरम्यान बेंगळुर ते निपाणी दरम्यान “भीम यात्रा” काढण्यात येणार असून, मार्गात निवडक ठिकाणी जनजागृती सभा घेतल्या जातील. या भव्य सभेसाठी केंद्रातील मंत्र्यांना आमंत्रित करण्याची शक्यता असून, यासंदर्भातील माहिती लवकरच दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. आंबेडकर यांचे निधन झाल्यानंतर नेहरूंच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने त्यांचा शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार न करता एकप्रकारे त्यांचा अवमानच केला होता असा आरोप महेश यांनी केला. तसेच काँग्रेसने त्यांना “ब्रिटिशांचा एजंट” व “देशद्रोही” ठरवले होते. मात्र भाजपने आंबेडकरांचा झालेला अपमान दुरुस्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे, असे ते म्हणाले.
यानंतर आमदार शशिकला जोल्ले यांनी बोलताना सांगितले की, एप्रिल 11 रोजी डॉ. आंबेडकर आणि रमाबाई यांच्या निपाणी भेटीला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिल 15 रोजी भव्य सभा आयोजित केली जात आहे. हिवाळी अधिवेशनाच्या वेळीही यासंबंधी सरकारकडे मागणी केली होती. महात्मा गांधी यांनी बेळगावला दिलेल्या भेटीस शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम झाला. पण बाबासाहेबांनी निपाणीला दिलेल्या ऐतिहासिक भेटीबाबत सरकारने दुर्लक्ष का केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र केंद्र व राज्यातील भाजपच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला असून, ही सभा संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारी ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी माजी खासदार मुनीस्वामी, अण्णासाहेब जोल्ले, आमदार दुर्योधन ऐहोळे, भाजपच्या एससी मोर्चाचे माजी राज्य महासचिव महेंद्र कात्याळ, चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश अप्पाहिगोळ, नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, समाजाचे नेते आदी उपस्थित होते.


Recent Comments