के.एल.ई. संस्था गुणवत्तापूर्ण कायदे शिक्षणास प्राधान्य देत आहे आणि त्यातून अनेक विद्यार्थी न्यायव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर कार्यरत झाले आहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन के.एल.ई. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.
बी.व्ही. बेल्लद लॉ कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने 6 एप्रिल 2025 रोजी आयोजित ‘वॉकेथॉन’ स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
डॉ. प्रभाकर कोरे पुढे म्हणाले की, के.एल.ई. संस्था मागील 109 वर्षांपासून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत असून सामाजिक सेवा ही संस्थेची ओळख आहे. संस्थेच्या कायदा महाविद्यालयांने अनेक गुणवंत नामवंत वकील समाजाला दिले आहेत.

या वॉकेथॉन स्पर्धेला कॉलेज कॅम्पसपासून सुरुवात होऊन, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, रेल्वे स्टेशन सर्कलमार्गे पुन्हा महाविद्यालय परिसरात समारोप करण्यात आला. या स्पर्धेत 400 हून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ वकील आर.बी. बेल्लद उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. ज्योती जी. हिरेमठ यांनी अध्यक्षीय भाषण केले. ज्येष्ठ वकील टी.सी. मोदगी, ए.सी. बेंबळगी, सनील तुबची, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. चा. राव, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वॉकेथॉनमध्ये भाग्यश्री मगनट्टी व सागर बेळवी यांना प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना आर.बी. बेल्लद यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


Recent Comments