बेळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाराष्ट्र सरकारकडे कृष्णा नदीत 2 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
बेळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारकडे कृष्णा नदीत 2 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, मोठ्या आणि लहान पाटबंधारे विभागाशी चर्चा करून प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्यानंतर हे पत्र महाराष्ट्र सरकारला पाठविण्यात आले आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यात पाण्याची कमतरता नाही, मात्र संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन टंचाई जाणवणाऱ्या गावांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास खासगी बोअरवेल आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. हिडकल जलाशयातून बागलकोट जिल्ह्यासाठी आधीच 2 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. तसेच, घटप्रभेच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांमध्येही 2 टीएमसी पाणी सोडले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
तसेच मागील वर्षीच्या थकीत देयकाचा कारखान्यांनी भरणा केला आहे. ऊस नियंत्रण कायद्याअंतर्गत ऊस वाहतुकीनंतर 15 दिवसांत शेतकऱ्यांना देयक दिले पाहिजे. हा नियम न पाळणाऱ्या कारखान्यांना आधीच नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व कारखान्यांनी लवकरच ऊस थकीत रक्कम अदा करणार असल्याचे सांगितले आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments