Belagavi

कर्नाटक राज्य पोलिस ध्वज दिन उत्साहात साजरा

Share

कर्नाटक राज्य पोलिस ध्वज दिनाचा सोहळा आज बेळगावात मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आकर्षक पोलिस परेडने सर्वांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सेवेसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

बेळगाव शहर पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने आज जिल्हा पोलिस मैदानावर कर्नाटक राज्य पोलिस ध्वज दिन सोहळा पार पडला. यावेळी पोलिस विभागाच्या वतीने भव्य परेडचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर आयजीपी डॉ. चेतनसिंग राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पीएसआय गंगाधर हेगडे आणि निवृत्त सीएचसी गाळेप्पा हडगीनाळ उपस्थित होते. यावेळी बोलताना गंगाधर हेगडे यांनी कर्नाटक पोलिस दलाच्या ऐतिहासिक वाटचालीबद्दल माहिती दिली. तसेच पोलिस ध्वजाच्या विक्रीतून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग निवृत्त आणि सेवेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व अन्य कल्याणकारी योजनांसाठी केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, उत्तर आयजीपी डॉ. चेतनसिंग राठोड यांनी पोलिस दलात काम केलेल्या निवृत्त पोलिस अधिकारी आणि सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिस दलातील कार्यरत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्याचा हेतू स्पष्ट केला. पोलिस ध्वज विक्रीतून संकलित निधी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी, कर्मचारी, आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: