आमचा गट भाजपमध्येच कायम राहील, यत्नाळ यांनी वेगळा पक्ष स्थापन करण्याचा इशारा दिला असला तरी यात तथ्य नसून आम्ही सर्वजण भाजपमध्येच कार्यरत राहू असा विश्वास गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भाजप आणि आर.एस.एस. कटीबद्ध आहेत, आणि देशासाठी वेगळ्या पक्षाची आवश्यकता नाही. यत्नाळ यांनी वेगळा पक्ष स्थापन करण्याचा विचार व्यक्त केला असला तरी त्यांचा उद्देश काही वेगळा आहे. आमच्या गटाने भाजपातून कधीही बाहेर पडण्याचा विचार केलेला नाही, यत्नाळ आणि त्यांचा गट भाजपातच राहील. यत्नाळ यांच्या पक्ष स्थापनेची घोषणा केवळ प्रचारासाठी आहे, असे जारकीहोळी यांनी नमूद केले.
त्यांनी यत्नाळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले, यत्नाळांचा उद्देश वेगळा आहे. ते भाजपाच्या विरोधात काहीही बोलत असले तरी आम्ही भाजपातच राहू. जारकीहोळी यांनी भाजपाच्या वतीने पंचमसाली समाजाच्या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया देत यत्नाळ यांच्या विरोधकांना त्यांच्या भाषणांचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली.
रमेश जारकीहोळी यांना भाजप राज्याध्यक्ष विजयेंद्र यांच्या विरोधात कर्नाटक सरकारच्या निषेधात सहभागी होणार का, असा सवाल विचारला असता, यावर विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
राजकीय वैरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मात्र जारकीहोळींनि प्रतिक्रिया देणे टाळले.
Recent Comments