जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची २६२४ वी जयंती १० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे जन्म कल्याण महोत्सव मध्यवर्ती समितीचे मानद सचिव राजेंद्र जैन यांनी सांगितले.

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ३ एप्रिल रोजी भरतेश शैक्षणिक संस्था आणि ७ एप्रिल रोजी गोमटेश विद्यापीठ, हिंदवाडी येथे दोन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ५ एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भजन स्पर्धा, टॅलेंट शो, जैन पाककला यासारखे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
६ एप्रिल रोजी भव्य बाईक रॅली आयोजित केली जाणार असून या रॅलीमध्ये सुमारे ५०० लोक सहभागी होणार आहेत. ही रॅली सकाळी ८ वाजता सीपीएड मैदानापासून सुरू होईल आणि सदाशिवनगर, विश्वेश्वरय्या नगर, राणी चन्नम्मा सर्कल आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरून पुढे जाईल. या रॅलीची सांगता महावीर भवन येथे होईल. यासह ७ आणि ८ एप्रिल रोजीही भरगच्च कार्यक्रमांचे आयॊजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
उत्सव समितीचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, अलिकडच्या काळात वाढत्या उष्णतेमुळे मुख्य मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे. या वर्षी, १० एप्रिल रोजी, उत्सवाची मुख्य मिरवणूक शहरातील टिळक चौकातून सुरू होईल, शेरी गल्ली, शनि मंदिर रोड, एस.पी.एम. मार्गे पुढे जाईल.
ज्येष्ठ वकील रविराज पाटील म्हणाले की, महावीर जन्मकल्याण महोत्सव मिरवणुकीनंतर प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही २५,००० लोकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जितो चे सरचिटणीस अभय आदिमानी म्हणाले की, जन्मकल्याण महोत्सव जैन समुदायासाठी एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला भरतेश शैक्षणिक संस्थेचे सचिव विनोद दोड्डन्नावर, महोत्सव समितीचे सहसचिव हिराचंद कलमनी, राजू खोडा, सुरेखा गौरगोंडा, अरुण शहा, आदी उपस्थित होते.
Recent Comments