गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात तापमानात मोठी वाढ झाली होती. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वळिवाच्या पावसाने शहराला तात्पुरता दिलासा मिळवून दिला.

सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अखेर संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास शहरात अचानक ढग दाटून आले आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह वळिवाने जोरदार हजेरी लावली. तासाभराहून अधिक काळ कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले.
गेल्या महिनाभरापासून वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. रात्रीसुद्धा उष्णतेमुळे झोप लागत नव्हती. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना सोमवारी वळिवाच्या सरींनी थोडासा दिलासा मिळवून दिला. मात्र, या पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामांची पोलखोल झाली. येडियुरप्पा मार्ग, बायपास मार्ग, फोर्ट रोड, जिजामाता चौक, नरगुंदकर भावे चौक, रूपाली टॉकीज परिसर, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, तानाजी गल्ली आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
प्रशासनाकडून दरवर्षी पावसापूर्वी गटारांची साफसफाई आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या यंत्रणेची तपासणी केली जाते, असे सांगितले जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांची यादीच जाहीर केली जाते. मात्र, प्रत्यक्षात वळिवाच्या पावसानेच या कामांतील घोटाळा समोर आणला असून पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या कामावर ताशेरे ओढण्यात येत आहेत.
Recent Comments