बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, त्याअंतर्गत रस्ते, शाळा, समाजभवन आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील धामणे (एस) येथील सरकारी मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या दोन अतिरिक्त वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी सोमवारी भूमिपूजन करण्यात आले. या कामांसाठी अंदाजे 44.83 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत, यासाठी संबंधित कंत्राटदारांना योग्य सूचना देण्यात आल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी, मतदारसंघातील विकासकामे कोणतेही भेदभाव न ठेवता सातत्याने सुरू असून, ग्रामस्थांच्या मागण्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही विकासयात्रा यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. धामणे (एस)-हजगोळी मुख्य रस्त्यापासून धनगरवाडीस जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठीही या वेळी भूमिपूजन करण्यात आले. सुमारे 8 कोटी रुपये खर्चून हा रस्ता डांबरीकरण करण्यात येणार असून, स्थानिकांच्या सूचनांचा विचार करून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश गुत्तेदारांना देण्यात आल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला युवराज कदम, धाकलू पाटील, मारुती चोकुळकर, प्रकाश हजगोळकर, गावडू बेक्केहाळकर, सोमण्णा पाटील, अप्पाजी पाटील, अभियंता केदार, पत्तार, शेंगुंसी, मनोहर बेळगांवकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याच्या भूमिपूजनानंतर महाराष्ट्रातील हजगोळी येथील वारकरी संप्रदायाने मंत्री हेब्बाळकर यांना पारायण कार्यक्रमाला निमंत्रित केले. त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन वारकऱ्यांशी संवाद साधला.
Recent Comments