Belagavi

बेळगावच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य! महानगरपालिका झोपेत?

Share

बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, या घाणीमुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. महानगरपालिकेने स्वच्छतेसाठी कितीही मोहिमा राबवल्या, तरी कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत अद्याप अनागोंदीच आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचा निष्क्रियपणा कायम आहे.

बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळील कामत गल्ली क्रॉस हा भाग सध्या घाणीच्या विळख्यात सापडला आहे. स्थानिक दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिक आपला कचरा या ठिकाणी टाकत असल्याने येथे मोठा कचऱ्याचा ढीग साचला आहे. दुर्गंधीचा प्रादुर्भाव होत असून, नागरिकांना या मार्गावरून जाणेही मुश्किल झाले आहे.

या कचऱ्यात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाहनांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांना हैराण करणे आणि रात्रीच्या वेळी गर्दीच्या भागात वावरणे यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

महापालिकेने अलीकडेच एक बैठक घेऊन शहराच्या प्रवेशद्वारांवरील कचरा तातडीने हटवला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, कामत गल्ली क्रॉससारख्या ठिकाणीच जर कचऱ्याचा ढीग साचत असेल, तर ही घोषणा केवळ दिखावा होती का? महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच स्वच्छतेकडेही तितकेच गांभीर्याने पाहिले पाहिजे. अन्यथा, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका नागरिकांना बसत राहील.

Tags: