पंचमसाली समाजाच्या 2 अ आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात बोलताना, भाजपच्या 80 टक्के लोकांचा याला पाठिंबा असल्याचे जे विधान श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी केले आहे, ते ऐकून आपले मन उद्विग्न झाल्याचे राज्याच्या महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
आज बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या हकालपट्टी बद्दल श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी वक्तव्य करताना आणि याचा निषेध करताना भाजपचे 80 टक्के सदस्य पंचमसाली समाजाच्या 2 अ आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होते, असे विधान करणे क्लेशदायक असून या विधानाने मी दु:खी झाले आहे. पंचमसाली आणि लिंगायतांनी आरक्षणाला निःपक्षपाती पाठिंबा दिला आहे, असे स्पष्ट करताना
पंचमसाली स्वामीजींनी पक्षांना मार्गदर्शन करावे पण मर्यादा ओलांडू नयेत असा विनंती वजा सल्ला लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला.
आमचे सरकार शेतकरी हित साधणारे आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने दुधाच्या किमतीत 4 रुपयांची वाढ केली आहे. वीज स्मार्ट मीटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही. भाजपकडे कोणतेही काम नसल्याने ते आमच्यावर भलता सलता आणि बिनबुडाचा आरोप करीत असल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यावेळी बोलताना म्हणाल्या.
यत्नाळ यांची हकालपट्टी आणि नवीन पक्ष स्थापन करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, यत्नाळ यांचा तोल अलीकडे ढासळत चालला आहे. जिभेवरही त्यांचे नियंत्रण राहिलेले दिसत नाही, असा शाब्दिक षटकार मारत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नवीन पक्ष स्थापन करणाऱ्या यत्नाळ यांना आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगितले.
जानेवारी महिन्यातील गृहलक्ष्मीचे पैसे गुढीपाडवा आणि रमजान दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून फेब्रुवारीचा हप्ताही लवकरच जमा केला जाईल, असे त्यानी सांगितले.
उडपीमधील लव्ह जिहाद प्रकरणाबाबत तेथील जिल्हा पोलीस प्रमुखांकडून माहिती घेतल्यानंतर ठोस कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.हनी ट्रॅपबाबत उपमुख्यमंत्री आणि राजण्णा यांच्यात थेट संवाद झाल्याचा कोणताही पुरावा नाही. राजण्णा यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असे त्या म्हणाल्या.

यावेळी उत्तरचे आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments