आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या प्रकरणात पुढे काय होणार, याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून आम. यत्नाळ यांच्या निलंबन प्रकरणी हायकमांडची भूमिका बदलू शकते सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हुबळी येथे आज माध्यमांशी बोलताना शेट्टर म्हणाले, एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शक्य तितक्या लवकर योग्य ती कारवाई केली जाईल. हायकमांड योग्य वेळी निर्णय घेईल. बिहार, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येईल. उत्तर भारतात भाजपचा प्रभाव आहेच. त्यामुळे अशा परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र राहणं महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री कुमारस्वामी आणि राज्य मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट ही योगायोगाने आणि औपचारिक पद्धतीने झाली होती. मात्र, ज्येष्ठ नेते देवेगौडा यांच्यासोबत झालेल्या चर्चेचं वेगळं महत्त्व असू शकतं, असं शेट्टर यांनी सूचित केलं.
हनीट्रॅप प्रकरणी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, हे प्रॉक्सी वॉर आहे. नेते स्वतः बोलत नाहीत, त्यांच्या पाठच्या आमदार आणि मंत्र्यांमार्फत बोलतात. मुख्यमंत्री सिद्धरामय्या या प्रकरणावर गप्प आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारही शांत आहेत. राजण्णा यांनी सभागृहात उघडपणे बोललं, पण आता तक्रार करायचं टाळत आहेत. तक्रार उशिरा दाखल करणं म्हणजे काहीतरी वेगळंच सुरू आहे. त्यांच्या आत काहीतरी घडत आहे, ते झाकण्याचा प्रयत्न केला जातोय. हनीट्रॅपचं सत्य बाहेर आलं, तर राज्य सरकार अडचणीत येईल. त्यामुळेच काहीच बाहेर येऊ दिलं जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात संघर्ष सुरू आहे. यात कोण कमकुवत ठरणार आणि कोण मजबूत राहणार, हे अजून स्पष्ट नाही. पण राज्य सरकार तग धरू शकत नाही. ते आधीच संपलंय, आता केवळ पोस्टमॉर्टेम बाकी आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Recent Comments