बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन सोहळ्यात महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, कायद्याचे पालन करण्याची नागरिकांची जबाबदारी आणि महिलांच्या हक्कांविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले.

बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने न्यायालय सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भारतीय संविधानाच्या सामर्थ्यावर भर दिला. कायद्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, भारतीय संविधान संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहे. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील महिलेने राज्य सरकारमध्ये मंत्रीपद गाठणे हे संविधानाच्या ताकदीचेच प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना व पुरुषांना समान हक्क बहाल केले. न्यायालयाने देखील महिला वकिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटक राज्य महिलांविषयी अधिक प्रगतशील आहे. महिलांनी आत्मविश्वास बाळगून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावे, असे आवाहनही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

या वेळी न्यायाधीश त्यागराज इनवळ्ळी, अश्विनी सिरीयनवर, के. कात्यायनी, सी.एम. पुष्पलता, बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. किवडसण्णवर, उपाध्यक्ष बसवराज मुगळी, सचिव यल्लप्पा दिवटे, अश्विनी हवालदार यांसह अनेक वरिष्ठ वकील उपस्थित होते.


Recent Comments