बेळगाव महानगर आणि ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांच्या कडेला कचरा टाकण्याऐवजी ओला आणि सुका कचरा वेगळा करून कचरा व्यवस्थापन केंद्राला द्यावा. पुढील १५ दिवसांत सर्व रस्ते कचऱ्यापासून मुक्त करावेत, असा खडसावणारा इशारा आज बेळगाव महानगरपालिकेच्या बैठकीत मनपा आयुक्तांनी दिला.

शहर – परिसर, ग्रामपंचायत अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवर मोठया प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचरा विल्हेवाट व्यवस्थापनात अपयश आल्याचे निदर्शनात येताच आज बेळगाव महानगरपालिकेत महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी विलास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कचरा व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली होती.
यावेळी महानगरपालिका आयुक्त शुभा बी. बोलताना म्हणाल्या, बेळगाव शहर विविध राज्यांना जोडणारा दुवा आहे. मात्र, येथे येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत कचऱ्याच्या ढिगाऱ्याने होत आहे. ग्रामपंचायती व नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला कचरा टाकण्याऐवजी ओला-सुका कचरा वेगळा करून कचरा व्यवस्थापन केंद्राला द्यावा. येत्या १५ दिवसांच्या आत शहर परिसरातील रस्ते कचरामुक्त करण्यात यावेत, असे कडक निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
यावेळी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी बोलताना म्हणाले की, त्यांच्या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या अडचणी येत आहेत. गटारातून काढलेला कचरा बेनकनहळ्ळी रस्त्यावर टाकला जात आहे, यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
सांबरा ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही ओला-सुका कचरा वेगळा करण्याबाबत जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच कचरा व्यवस्थापनासाठी एक ठिकाण निश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
महानगरपालिका आयुक्त शुभा बी. बोलताना म्हणाल्या, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्यांवर कचरा टाकू नये, तर तो कचरा व्यवस्थापन केंद्राला द्यावा. महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी याची जबाबदारीने अंमलबजावणी करावी. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. तसेच एप्रिल २० रोजी या संदर्भात पुन्हा बैठक बोलावली जाईल, असे त्या म्हणाल्या. याशिवाय काही नागरिक कुठेही प्लास्टिक टाकत आहेत, त्यामुळे गायी व अन्य जनावरांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे शहराशिवाय जनावरांसाठी स्वतंत्र चरणव्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला सांबरा विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, पशुपालक, सत्ताधारी पक्षाचे नेते गिरीश धोंगडी, पर्यावरण अधिकारी हणमंत कलादगी, आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीशैल कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
Recent Comments