Belagavi

मराठी’ विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

Share

सरस्वती वाचनालय आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने ‘मराठी’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मातृभाषेच्या संवर्धनावर भर देत मान्यवरांनी विचार मांडले. तसेच, विद्यार्थ्यांनी स्थानिक बोली भाषेत सादरीकरण करून मराठीच्या वैविध्यतेला उजाळा दिला.

बेळगावच्या शाहापूर येथील श्री सरस्वती वाचनालयाच्या वतीने आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या अनुवाद प्रकल्पांतर्गत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी’ विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

परिसंवादाच्या उद्घाटन सत्राचे उद्घाटन राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी.एम. त्यागराज यांच्या हस्ते पार पडले. सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार अध्यक्षस्थानी होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे निवृत्त मराठी भाषा प्रमुख डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. सी.एम. त्यागराज यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन शिकण्याची वृत्ती ठेवावी आणि मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी योगदान द्यावे. तर, प्रा. स्वरूपा इनामदार यांनी भाषेच्या संवर्धनावर भर देत, भाषा ही आपल्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. आपण मराठीत विचार करून, बोलून आणि लिहून तिच्या समृद्धीमध्ये हातभार लावला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी मराठीतील स्थानिक बोली भाषांमध्ये आपली सादरीकरणे केली.

यावेळी विजयकुमार दळवी, प्रा. स्वरूपा इनामदार, डॉ. विनोद गायकवाड, मैजुद्दीन मुतवल्ली, डॉ. संजय कांबळे, सुहास सांगलीकर, आर.एम. करडीगुड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: