Uncategorized

नरेगा कामगारांच्या थकीत वेतनासाठी आंदोलन

Share

सौंदत्ती तालुक्यातील मरकुंबी येथील नरेगा कामगारांनी त्यांच्या थकीत वेतनासाठी आंदोलन छेडले. जिल्हा पंचायतीसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाच्या नेतृत्त्वाखाली कामगारांनी जोरदार निदर्शने केली.

नरेगा कामगारांचे वेतन गेल्या ४ महिन्यांपासून थकीत आहे, त्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामगारांना लवकर वेतन द्यावे आणि मेटी नोंदणी त्वरित करावी, अशा मागानीस्ताव आज सौंदत्ती तालुक्यातील मरकुंबी येथे नरेंगा कामगारांनी आंदोलन छेडत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

यावेळी कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाच्या जिल्हाध्यक्षा शकुंतला इलगे यांनी सांगितले की, गेल्या ३-४ वर्षांपासून मेटी प्रमाणपत्र तसेच वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यांनी स्वतःच्या श्रमाचा मोबदला मागण्यात काही गैर नाही, यामुळे तातडीने थकीत वेतन अदा करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष इरफान बागेवाडी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये नरेंगा योजनेत भ्रष्टाचार होत आहे. विशेषतः मरकुंबी ग्रामपंचायतीतील कामगारांचे वेतन ४-५ महिन्यांपासून अडकून आहे, यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचेही दिसून येत असून याबाबत योग्य पडताळणी करून थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात मरकुंबीतील नरेंगा कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सदर मागण्या तातडीने मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिला आहे.

Tags: