Banglore

‘डिनर मीटिंग’ कि सेटिंग??? कुमारस्वामी-सतीश जारकीहोळी यांच्यातील गुप्त बैठकीमुळे चर्चेला उधाण

Share

कर्नाटकमधील राजकीय हालचालींमध्ये मोठी खलबतं सुरू असतानाच दिल्लीमध्ये एका खास डिनर मीटिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते, मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्लीत बैठक घेतल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

कर्नाटकमध्ये एकीकडे हनीट्रॅप प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले असतानाच, दुसरीकडे दिल्लीमध्ये जेडीएस आणि काँग्रेस नेत्यांची गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारमधील मंत्री आणि जेडीएस नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी आपल्या निवासस्थानी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, या पार्टीला काँग्रेस नेते आणि कर्नाटकमधील मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हजेरी लावल्याचे समजते.

ही भेट साधी सौजन्य बैठक होती की भविष्यातील कोणत्यातरी मोठ्या राजकीय समीकरणाचा भाग? यावर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, सतीश जारकीहोळी हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत. या काळात त्यांनी कुमारस्वामी यांची भेट घेतल्याने अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, कर्नाटकमध्ये काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, त्याचवेळी जेडीएससाठी भविष्यातील राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक अधिक महत्त्वाची ठरू शकते. मात्र, अद्यापही या डिनर मीटिंगबाबत कुमारस्वामी किंवा सतीश जारकीहोळी यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या भेटीमागचे नेमके कारण काय? ही गुप्त बैठक त्यांच्या भविष्यातील राजकीय निर्णयांशी संबंधित आहे का? याबाबत सध्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Tags: