Belagavi

संगोळी रायण्णा बी.एड. कॉलेजमध्ये विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन

Share

बेळगावमधील क्रांतीवीर संगोळी रायण्णा बी.एड. कॉलेजमध्ये 2024-25 च्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेशी यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला.

बेळगावच्या कनकदास शिक्षण समितीच्या क्रांतीवीर संगोळी रायण्णा बी.एड. कॉलेजमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. 44व्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त जी. एस. संग्रेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या संस्थेशी असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या विकासाचे कौतुक केले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना जी. एस. संग्रेशी यांनी सांगितले की, त्यांनी या संस्थेतून एस. एस. एल. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसेच संस्थेचे संस्थापक स्व. गविसिद्धप्पा बेलवडी यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि संस्थेच्या वाढीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट यांचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

विद्यार्थी परिषदेबरोबरच विषय क्लबचा उद्घाटन सोहळा देखील पार पडला. महाविद्यालयाच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारावे, असे मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले.

या समारंभाला कनकदास शिक्षण समितीचे अध्यक्ष रवी बी. दंडीनहे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्राचार्य डॉ. बी. जी. धारवाड, तसेच प्राध्यापक डॉ. एन. ए. पुजारी, डॉ. एन. एस. जाधव, प्रा. डी. एच. नाईक, एस. आर. तोरणगट्टी, विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: