Belagavi

उद्या बेळगावमध्ये 3 हजार गर्भवती महिलांसाठी सामूहिक सीमंत कार्यक्रम : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली माहिती

Share

राज्य सरकार नवजात बालकांपासून ते 100 वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या लोकांचे जीवन घडविण्यासाठी कार्यरत आहे. महिला आणि बाल कल्याण खात्याच्यावतीने उद्या बेळगावमध्ये 3 हजार गर्भवती महिलांसाठी सामूहिक सीमंत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

आज बेळगाव येथे बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
गर्भवती महिलांचे मन सदृढ आणि सकारात्मक ठेवण्याच्या आणि त्यांची बाळे निरोगी जन्माला यावीत या उद्देशाने उद्या बेळगावातील सीपीईडी मैदानावर 3 हजार गर्भवती महिलांसाठी सामूहिक सीमंत कार्यक्रम आयोजित केला जात आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
याशिवाय दिव्यांग दिनानिमित्त 100 दिव्यांगांना तीन चाकी वाहने वितरित केली जाणार आहेत. अंध मुलांना ब्रेल लॅपटॉप दिले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, महिला आणि बाल कल्याण खाते हे 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेपासून 100 वर्षांच्या वृद्धा पर्यंतच्या लोकांचे जीवन घडवण्याचे काम करत आहे.

 

5 जिल्ह्यांमधील स्व सहाय्य संघांच्या महिलांचे प्रदर्शन स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक गर्भवती महिलेच्या दाराशी पौष्टिक आहार पोहोचविण्याचा मानस आहे. समंत हा सरकारचा पहिला कार्यक्रम बेळगावमध्ये होणार असून, त्यानंतर दुसरा कार्यक्रम 26 मार्च रोजी बेळारीमध्ये होणार आहे. गोड पोळी जेवणाचा आस्वाद घेऊन गर्भवती महिला घरी जाईतो पर्यंत अंगणवाडी सेविका त्यांच्यासोबत असतील, असेही लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.

हनीट्रॅप प्रकारणाबद्दल त्यांनी खेद व्यक्त करीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यावर निर्णय घेतील आणि चौकशी करतील, असे सांगितले. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, याचे उत्तर स्वतः मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडूनच घ्या, असे सांगितले.

 

यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: