Belagavi

फॉलोअर चित्रपटावर करवे कंपूची वक्रदृष्टी : आंदोलन करून पाडला चित्रपट बंद

Share

रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर शो झालेल्या आणि बेळगावीतील एका तरुणाने निर्मित केलेल्या ‘फॉलोअर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामेगौडा गटाने तीव्र विरोध केला. हा चित्रपट सीमा वाद निर्माण करणारा असल्याचा आरोप करीत या करवे गटाने बेळगावमधील चित्रपटगृहात कन्नड सोडून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट दाखवले गेले तर चित्रपटगृहच बंद पडण्याचा इशारा या करवे कंपूने दिला.

बेळगाव मध्ये बी.ई. शिक्षण घेणारा विद्यार्थी हर्षद नलवडे याने फॉलोअर हा चित्रपट निर्माण केला आहे. रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला होता. बेळगावच्या आयनॉक्स सिनेमागृहात, काल शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे . हा चित्रपट सीमावाद निर्माण करणारा असल्याचा आरोप करीत कर्नाटक रक्षक वेदिकाच्या शिवरामेगौडा गटाने निदर्शने करीत चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले. चित्रपटाचे प्रदर्शन रद्द झाल्यानंतर चित्रपट गृह संचालकाने चित्रपट पाहण्यास आलेल्या लोकांचे तिकिटाचे पैसे परत केले.

वारंवार विनंती करूनही, बेळगावमधील एका सिनेमागृहाचे मालक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट दाखवत आहेत. जर बेळगावमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट प्रदर्शित केले जातात, तर कन्नड चित्रपट कुठे प्रदर्शित करावेत? बेळगावातील आयनॉक्स सिनेमात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटावर बंदी घालावी. अन्यथा, कर्नाटक रक्षण वेदिके शिवरामेगौडा गटाला सिनेमाच बंद करावा लागेल, असा इशारा वाजिद हिरेकोडी यांनी दिला.

जर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांना काही अडचण नाही तर संघटनांना अडचणी का ? असा सवाल करीत चित्रपटात सीमा वाद असल्याचा आरोप चित्रपटाच्या टीमने फेटाळून लावला आहे. तीन मित्रांबद्दल आहे ज्यांना त्यांचे वाद मिटवण्यास सांगितले जाते.

आम्ही, बेळगावच्या लोकांनी, चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाचा प्रीमियर झाला. या चित्रपटाने देश-विदेशात प्रशंसा मिळवली आहे. चित्रपटाचे नाव कन्नड भाषेत लिहिले गेले आहे. हा चित्रपट तीन मित्रांवर आधारित आहे, असे चित्रपटाबद्दल बोलताना सांगण्यात आले आहे.

खडेबाजार एसीपी शेखरप्पा आणि कॅम्प पोलिस स्टेशनचे सीपीआय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Tags: