Bagalkot

स्वसंरक्षणासाठी मेंढपाळांना दिले जाणार बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण

Share

बागलकोट : बागलकोट येथील मेंढपाळांना पोलीस खात्याकडून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या मेंढपाळांना बंदूक परवाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असे बागलकोट जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी सांगितले आहे.
चोरांच्या वाढत्या उपद्रवापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी बागलकोट पोलीस खात्याने हा उपक्रम हाती घेतला आहे.

9 मार्च रोजी शरणाप्पा जन्मनकट्टी हा मेंढपाळ शिवारात बकरी चारत असताना तिघा बकरी चोरट्यानी बकरी चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मेंढपाळ शरणाप्पा याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या तिघांनी शरणाप्पावर हल्ला केला. चोरट्यानी शरणप्पाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि ते फरार झाले. या घटनेचे तीव्र पडसाद बागलकोट जिल्ह्यात उमटले होते.

ही घटना ताजी असतानाच बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अरभावी-संगणकेरी गावाबाहेर बकरी चोरट्याने एका मेंढपाळाच्या पायावर वार करून त्याचा पायच कापल्याची भयानक घटना उघडकीस आली. मेंढ्या चोरण्यासाठी आलेल्या चोरट्याला मेंढ्या चोरण्यास रोखणाऱ्या मेंढपाळाच्या पायावर शस्त्राने वार करून चोरट्याने हुक्केरी येथील बसप्पा गुरुवन्नावर नामक मेंढपाळाचा पाय कापला. या घटनेने मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

गेल्या दोन महिन्यांपासून मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना वाढल्याने मेंढपाळानी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन मेंढपाळानी संरक्षणाची मागणी केली होती. याची गांभीर्याने दखल घेत शरणप्पा खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, बागलकोट पोलिसांनी मेंढपाळांसाठी बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक मेंढपाळांना बागलकोट पोलीस खात्याकडून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या मेंढपाळांना बंदूक खरेदीसाठी बंदूक परवाने मिळवून दिले जाणार आहेत, असे बागलकोट जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी म्हटले आहे.

Tags: