सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर -उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व राखत महापालिकेवर निर्विवाद भगवा फडकविला.
शनिवारी दुपारी बेळगाव महापालिका सभागृहात झालेल्या निवडणुकीत महापौर उपमहापौरपदी भाजपने बाजी मारली. दोन्ही पदे बेळगाव दक्षिण मतदार संघालाच मिळवून देत दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आपले वर्चस्व कायम राखले.
आज शनिवारी बेळगाव महापालिकेच्या 23 वी महापौर-उपमहापौर निवडणूक प्रक्रिया झाली. मंगेश पवार, राजू भातकांडे, मारुती मोदगेकर व शाहिद खान पठाण चौघांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले होते. राजू भातकांडे व शाहिद खान पठाण यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर केवळ मंगेश पवार आणि मारुती मोदगेकर निवडणूक रिंगणात राहिले.
महापौरपदाच्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार यांनी 40 मते घेत महापौर पदी बाजी मारली आणि महापालिकेवर पुन्हा कमळ फुलविले. उपमहापौरपदासाठी नगरसेविका वाणी जोशी आणि लक्ष्मी लोकरी यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक 44 च्या नगरसेविका वाणी जोशी यांनी एकतर्फी बाजी मारत 40 मतांनी विरोधकांचा पराभव करत उपमहापौर पद मिळविले. निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहणाऱ्या अशोक शेट्टननवर यांनी निवडीची घोषणा केली.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी, ‘ नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौराने बेळगाव महापालिका कार्यक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहावे . राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून केवळ जनकल्याणासाठी झटावे असे सांगितले.
विधान परिषद सदस्य साबना तळवार यांनी, ‘ बेळगाव महापालिकेच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांना विश्वासात घेऊन बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन महापौर आणि महापौर आणि कार्यरत रहावे असे सांगितले. नवनिर्वाचित महापौर मंगेश पवार यांनी यावेळी बोलताना, महापालिकेतील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करेन अशी ग्वाही दिली.
यावेळी बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments