धारवाड कचरा विल्हेवाट घटकामधून निघणाऱ्या आरोग्य बाधक विषारी धुरामुळे त्रस्त झालेल्या होसयल्लापुरममधील राहिवाशांतून संताप व्यक्त होत असून या निषेधार्थ येथील रहिवाशी रस्त्यावर उतरले आहेत.

आरोग्यास बाधक ठरणाऱ्या या कचरा विल्हेवाट घटकाचे इतरत्र स्थलांतर करा अशी मागणी करीत येथील नागरिकांनी आंदोलन छेडले. लोकांचा संताप पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी नमते घेत येथील कचरा विल्हेवाट घटकाच्या स्थलांतरासाठी मे महिन्यापर्यंतचा वेळ मागितला आहे.
धारवाडमधील होसयल्लापूर येथील कचरा विल्हेवाट घटकातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी धारवाडमध्ये रस्त्यावर उतरून हुबळी- धारवाड महानगरपालिकेविरुद्ध निषेध व्यक्त करीत आंदोलन छेडले.
होसयल्लापुर येथील जनता नगर येथील चुना भट्टीजवळील रस्त्यावर ठिय्या मांडून रहिवाशांनी रास्ता रोको केला. यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्यांविरुद्ध आणि लोकप्रतिनिधींविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार विनवणी करूनही याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे आंदोलन छेडण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
काल कचरा डेपोतील कचऱ्याला आग लागल्याने विषारी धुरामुळे जन्नतनगर, होसयल्लापुर, टोलनाका आणि गांधीनगरसह अनेक ठिकाणच्या लोकांचे जगणे असह्य झाले. या भागात बिकट परिस्थिती निर्माण झाली. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रास्ता रोको करून महापालिकेचा निषेध करीत हा कचरा डेपो घटक इतरत्र हलविण्याची मागणी केली.
दरम्यान, महानगरपालिका आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली आणि लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र,, स्थानिकांनी कचरा डेपो इतरत्र हलविण्याचे ठोस आश्वासन मिळतोपर्यंत आंदोलने मागे घेणार नाही, असे ठणकावले. यामुळे महापालिका आयुक्तांनी नरमाईचे धोरण स्वीकारत मागणीच्या पूर्ततेसाठी मे महिन्यापर्यंतचा वेळ मागितला. आयुक्तांच्या आश्वासनानंतर स्थानिकांनी आंदोलन मागे घेतले आहे.
Recent Comments