Belagavi

ग्रामपंचायत सचिवांवर प्राणघातक हल्ला ….

Share

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायत पीडीओवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सचिव, पीडीओ संघटना आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या पीडीओवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या त्रिकुटाला अटक करून त्यांना कठोर शासन करावे, अशा मागणीचे निवेदन आज ग्रामपंचायत सचिव आणि पीडीओ संघटना तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले.

आंबेवाडी ग्रामपंचायत सचिव नागप्पा कोडली हे नरेगाच्या कामाची पाहणी करून ग्रामपंचायतीला जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्या हल्लेखोरांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांना कठोर शासन करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे यावेळी बोलताना पीडीओ जिल्हा कल्याण विकास संघटनेचे अध्यक्ष आनंद होळेन्ननवर यांनी म्हटले आहे.

पंचायत सचिवावरील हल्ल्याची ही घटना निंदनीय आहे. पंचायत कर्मचाऱ्यांच्या नैतिक आणि मानसिक स्थैर्याला धक्का देणारी ही घटना आहे. हल्लेखोरांना गुंडा कायद्याअंतर्गत अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. बेळगाव पश्चिम भागात मराठी आणि कन्नड असा भाषिकवाद नाही. सर्व भाषिक गुण्यागोविंदाने राहतात. असे पंचायत सचिव सुजाता बटकुर्की म्हणाल्या.

निवेदानाचा स्वीकार केल्यानंतर बोलताना जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी, याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सखोल तपास करीत आहेत. यामध्ये कोणताही भाषिक वाद नाही, असे म्हटले आहे.

हल्ला झालेल्या ग्राम पंचायत सचिव नागप्पा कोडली यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना, हल्ला झाला तेव्हा कन्नड आणि मराठी अशा दोन्ही भाषिकांनी आपल्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत कोणताही भाषिक वाद नाही, असे म्हटले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सचिव आणि पीडीओ संघटनेचे सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Tags: