आज बुधवार दिनांक 26 मार्च महाशिवरात्र निमित्त सर्वत्र धामधूम सुरू होती. गावातील अनेक लोक नदीचे पवित्र स्नान करण्यासाठी बाहेरगावी गेले असताना आज दुपारी १:१५ सव्वा एक वाजता कामत गल्ली राजहंसगड येथील शेतकरी श्री मल्लाप्पा भुजंग कुंडेकर यांनी वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या करड, पिंजर, कडबा या गवत गंजीना अचानक आग लागली.
आगीची तीव्रता इतकी होती की दूरवर रचून ठेवलेल्या माळशेणींनी सुद्धा आगीच्या झळीने पेट घेतला. त्यामुळे शेजारी अनेक जणांनी वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या गवत गंजांना धोका निर्माण झाला असल्याने गावातील वॉटरमॅन श्री जोतिबा बोंगाळे यांनी लागलीच गावातील पाणीपुरवठा सुरू करून व श्री मधू थोरवत यांनी आपला पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिल्याने परिसरातील गवतगंज्या या आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्या वाचून शाबूत राहिल्या.

त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शेजारी व अनेकांनी आग विझवून पुढील होणारा मोठा अनर्थ टाळला. पण या आगीत मात्र शेतकरी श्री मल्लाप्पा भुजंग कुंडेकर यांच्या चार गायींचे वर्षभराचे गवत आगीत संपूर्णपणे भक्षस्थानी पडल्याने जवळपास 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना आर्थिक स्वरूपाची गवत गंजीसाठी मदत करण्याची मागणी होत आहे.


Recent Comments