Belagavi

शहा आणि सी.टी. रवी यांना पदावरून हटवण्याची कर्नाटक दलित युवक संघाची मागणी

Share

कर्नाटक दलित युवक संघाच्या वतीने आज बेळगावात आंदोलन करण्यात आले. गृह मंत्री अमित शहा आणि विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांना पदावरून हटवावे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.

संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या आरोपावरून कर्नाटक दलित युवक संघाच्या वतीने आज बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले. गृह मंत्री अमित शहा यांनी संसदेत आंबेडकरांचे नाव घेणे हे फॅशन असल्याचे वक्तव्य केल्याचा निषेध करण्यात आला. तसेच सी.टी. रवी यांनी कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा निषेध करत त्यांनाही पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष महेश कोलकार म्हणाले की, “अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संविधानाचा अपमान झाला आहे. त्यांच्या पदावर राहण्यामुळे दलित समाजाचा अवमान होत आहे. तसेच भाजपचे काही नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. ही गोष्ट अत्यंत गंभीर असून, याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे.”

महेश कोलकार यांनी असेही सांगितले की, अमित शहा यांच्या विरोधात संपूर्ण कर्नाटकभर काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात येईल. त्याचप्रमाणे सी.टी. रवी यांनी महिला मंत्रीबद्दल वापरलेल्या भाषेचाही आम्ही निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा आणि रवी यांना तात्काळ पदावरून हटवावे. पंतप्रधानांनी अमित शहा आणि सी.टी. रवी यांच्यावर त्वरित कारवाई करावी. हे दोघे पदावर राहण्यायोग्य नाहीत.

या आंदोलनात मल्लेश कुरंगी, सुनील बस्तवाडकर, विठ्ठल तळवार, भरत कोलकार, हरीश मैत्री, मंजू कांबळे, संतोष शिंगे, दीपक मैत्री यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Tags: