हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबवण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याचे खासदार इरण्णा कडाडी यांनी सांगितले आहे.
राज्यसभेचे खासदार इरण्णा कडाडी यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली.
खासदार इरण्णा कडाडी यांनी सांगितले की, घटप्रभा हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून ते अनेक तालुक्यांचे केंद्रस्थान आहे. अमृत भारत योजना अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या घटप्रभा स्थानकाला वंदे भारत एक्सप्रेस थांबवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माझ्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत घटप्रभा स्थानकावर थांब्याचे आदेश दिले. याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना आणि सहकार्य करणारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे मी या भागातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो, असे खासदार इरण्णा कडाडी यांनी सांगितले.
खासदारांनी पुढे सांगितले की, लवकरच वंदे भारत एक्सप्रेसच्या थांब्याचा अधिकृत दिनांक जाहीर केला जाईल. या निर्णयामुळे घटप्रभा आणि आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Recent Comments