Belagavi

अंतर्गत आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मादिग समाजाचे निवेदन

Share

बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मादिग समाजाला अंतर्गत आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित करावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना सादर करण्यात आले आहे.

मादिग समाज अंतर्गत आरक्षण संघाच्यावतीने सदर निवेदन सादर करण्यात आले असून हिवाळी अधिवेशनात स्थानिक आमदारांनी मादिग समाजाच्या अंतर्गत आरक्षणाचा मुद्दा चर्चेत मांडावा, अशी मागणी करण्यात आली.

बसवेश्वर सर्कल येथील बसवेश्वर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून बँड वाजवत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या गृहकचेरीत पोहोचून त्यांच्या स्वीय सहाय्ककांकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

मादिग समाजाचे नेते यावेळी बोलताना म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून मादिग समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु आहे. आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश देखोल दिला असून काँग्रेस सरकार मादिग समाजाला अंतर्गत आरक्षण देण्यात टाळाटाळ करत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पालकमंत्र्यांनी याप्रश्नी आवाज उठवावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे ते म्हणाले.

यावेळी मादिग समाज आंदोलन समितीचे नेते रमेश मादार, शाबू सण्णक्की, रवी कडकोळ, रफिक बोकारे, कमला, मंजुळा आदींसह मादिग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: