राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच बाळंतिणी आणि नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर 16 डिसेंबर रोजी भाजप महिला मोर्चाकडून सुर्वणसौधकडे भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात महिला आणि नवजात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा शांभवी अश्वतपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे 75 बाळंतिणी आणि 322 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचं आकडेवारीवरून दिसून आले आहे. याशिवाय, बेळगाव आणि बळ्ळारी येथे महिला अत्याचाराच्या घटनाही घडल्या आहेत. या परिस्थितीला सरकारची नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे, याचप्रमाणे शक्ती योजनेमुळे महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.

भाजपच्या महिला मोर्चाकडून 16 डिसेंबर रोजी बेळगावमधील येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे भव्य आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनात भाजप महिला राज्याध्यक्षा, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते छलवादी नारायणस्वामी आणि अनेक आमदार उपस्थित राहणार असल्याचे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले. या आंदोलनानंतर सुर्वणसौधकडे भव्य मोर्चा काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments