बसवण्णांच्या अनुयायांना आम. यत्नाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र दु:ख झाले असून, हा बसव भूमीचा अपमान असल्याचे करवे नेते एम. सी. मुल्ला यांनी म्हटले आहे. यत्नाळ यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शहरात आयोजित पत्रकार परिषदेत करवेचे नेते एम. सी. मुल्ला यांनी यत्नाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी सांगितले की, यत्नाळ यांनी यापूर्वीही मठाधीश, राजकारणी, विचारवंत, प्रगतिशील तत्त्वज्ञ, आणि साहित्यिकांवर टीका केली आहे. मात्र, आता त्यांनी थेट समाजसुधारक आणि विश्वगुरू बसवण्णांचा अपमान केला आहे. हे बसव जनभूमीला केलेला अपमान असून, त्यांच्याविरोधात जनआक्रोश निर्माण होऊ शकतो.
ते पुढे म्हणाले की, राजकीय लाभासाठी यत्नाळ नेहमीच हिंदू-मुस्लीम वाद भडकवत असतात. त्यांच्या या वागणुकीला आता समाजातील सर्व स्तरातून विरोध होत आहे. जर यत्नाळ यांनी बेशर्त माफी मागितली नाही, तर त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज असल्यास आम्ही जनतेतून निधी गोळा करून त्यासाठी पुढाकार घेऊ.
मुल्ला यांनी असेही सांगितले की, विजापूर जिल्ह्याला यत्नाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बदनामी सहन करावी लागत आहे. विजापूरचे नाव सांगताना आता लोक नाखुशी व्यक्त करीत आहेत.


Recent Comments