विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींवर त्वरित उपाय करावा, अशी मागणी अभाविप कडून करण्यात आली आहे. आज बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन छेडून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

यावेळी अभाविपचे महानगर सचिव रवी बोलताना म्हणाले, यु. यु. सी. एम. एस. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यातील विविध विद्यापीठांत परीक्षा प्रवेशासाठी अर्ज भरले जातात. मात्र या सॉफ्टवेअरमध्ये अनेक तांत्रिक दोष आढळले असून या सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सदर सॉफ्टवेअर तातडीने रद्द करण्यात यावे, अन्यथा सुवर्णसौधला घेराव घालण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रथम पाटील या आंदोलनकर्त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले, राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या तांत्रिक समस्येमुळे अर्ज स्वीकृत न होणे, शुल्क भरल्यानंतरही अर्ज नोंदवला न जाणे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून शुल्क परत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा दंड भरावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत आहे, याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून समस्या सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा संघटन सचिव सचिन हिरेमठ यांनीही प्रशासनावर टीका केली. त्यांनी सांगितले, कि राणी चन्नम्मा विद्यापीठाने स्वतःचे सॉफ्टवेअर पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय अंमलात आणू नये. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर त्वरित उपाय केले पाहिजेत, अशी मागणी त्यानीं केली.
या आंदोलनात शेकडो अभाविप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.


Recent Comments