Athani

अथणीतील निराश्रित दलित कुटुंब प्रशासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

Share

अथणी तालुक्यातील कल्लोत्ती गावातील दलित कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. सहा दशकांपूर्वी बांधलेल्या घराची दारे आणि भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही मदतीचा हात मिळालेला नाही. यामुळे तातडीने मत मिळावी अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.

अथणी तालुक्यातील कल्लोत्ती गावात शैला पिंटू वायदंडे यांचे कुटुंब सध्या अत्यंत हलाखीच्या स्थितीत जीवन व्यतीत करत आहे. दलित समाजाच्या या कुटुंबाला मूलभूत सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. सहा दशकांपूर्वी बांधलेल्या कच्च्या घराच्या भिंती पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत, तर संपूर्ण कुटुंब सुरक्षित निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे.

शैला पिंटू वायदंडे यांनी सांगितले की, त्यांनी स्थानिक निवडून आलेल्या प्रतिनिधींपासून ते विकास अधिकाऱ्यांपर्यंत अनेकदा घर बांधून देण्यासाठी विनंती केली आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. आम्ही घर बांधण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तरी आम्हाला घर मिळावे, हीच एकच विनंती आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर या कुटुंबाच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Tags: