Uncategorized

नक्षल कारवायांना आळा घालण्यासाठी विक्रम गौडाचा एन्काउंटर : मुख्यमंत्री

Share

नक्षल चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई करत विक्रम गौडा या नक्षली म्होरक्याचा एन्काउंटर केला आहे. शरणागतीचा आदेश देऊनही सदर आदेश नाकारल्याने ही कारवाई करण्यात आली, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी स्पष्ट केले.

नक्षल चळवळीचा कणा मोडण्यासाठी विक्रम गौडा यांच्यावर केलेल्या एन्काउंटरची घटना सध्या चर्चेत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, विक्रम गौडा हा नक्षल चळवळीत सक्रिय होता आणि त्याच्या अटकेसाठी केरळ सरकारने २५ लाख, तर कर्नाटक सरकारने ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विक्रम गौडा याला शरणागतीसाठी वारंवार आदेश देण्यात आले होते. मात्र, त्याने ते नाकारले. त्यामुळे पोलिसांनी परिस्थितीचा विचार करून एन्काउंटर केला.

दरम्यान, प्रगतीशील विचारवंतांकडून या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काहींनी हा अपघात नव्हे तर नियोजित कारवाई असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विक्रम गौडा याचा मृतदेह मणिपाल येथील केएमसी शवागारात पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आला होता. बुधवारी पहाटे पोस्टमार्टेम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

विक्रम गौड यांच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, कुडलू येथील त्यांच्या जमिनीवरच भावाचे अंतिम संस्कार होणार आहेत. आम्ही तो निर्णय आधीच घेतला आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवी दिल्ली दौऱ्याबाबतही यावेळी माहिती दिली. कर्नाटकसाठी नाबार्ड कर्जाच्या रकमेत झालेल्या कपातीविरोधात ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: