Uncategorized

येळ्ळूर गावात जमिनीच्या वादातून हाणामारी; दोघे गंभीर जखमी

Share

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावात 24 गुंठे जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या संघर्षात अरविंद पाटील आणि दर्शन पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी संध्याकाळी येळ्ळूर गावात 24 गुंठे जमिनीच्या हक्कावरून झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली. अरविंद वसंत पाटील यांनी खरेदी केलेल्या या जमिनीवर त्यांनी हक्क सांगत बोर्ड लावला होता. मात्र, वडगाव येथील काही युवकांनी हा बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे वादाला तोंड फुटले.

घटनेत वाद अधिक तीव्र झाल्याने अरविंद पाटीलवर हल्ला करण्यात आला आणि त्यांचा विरोध करणाऱ्या दर्शन पाटील यांचा हात कापला गेला. जवळच लग्न समारंभ सुरू असताना हा संघर्ष घडल्याने स्थानिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेतील दोन्ही जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे येळ्ळूर गावात तणाव निर्माण झाला असून, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून अधिक चौकशी करत आहेत.

Tags: