Uncategorized

गोकाकला नूतन जिल्हा केंद्र बनवण्यासाठी आंदोलन

Share

गोकाक जिल्ह्याची मागणी एकत्र येऊन जोरात केली जात आहे. गोकाक नूतन जिल्हा केंद्र बनवण्यासाठी संघर्ष सुरूच राहील, अशी घोषणा गोकाक जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री मुरुगराजेंद्र महास्वामी यांनी केली.

मंगळवारी गोकाक जिल्हा संघर्ष समिती, वकिल संघ आणि शहरातील विविध संघटनांनी एकत्र येऊन मंगळवारी मोठा आंदोलन केले . यावेळी श्री मुरुगराजेंद्र महास्वामी म्हणाले, गोकाक जिल्हा निर्माणासाठी गेल्या ४ दशकांपासून संघर्ष सुरु आहे. सरकारने या मागणीला अजून पर्याय दिला नाही. आगामी हिवाळी अधिवेशनात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सरकारवर दबाव आणून गोकाकला नूतन जिल्हा केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. असे ते म्हणाले .

युवा नेता सर्वोत्तम जारकीहोळी यांनी सांगितले, गोकाक जिल्हा संघर्षाला आमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. मंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी नेहमीच या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधले आहे. आम्ही भविष्यात होणाऱ्या सर्व लढ्यात पूर्ण पाठिंबा देऊ.

काँग्रेस नेते डॉ. महांतेश कडाडी म्हणाले, बेळगाव जिल्हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे आणि त्याला विभागून गोकाक नवीन जिल्हा बनवणे आवश्यक आहे. गोकाकचे विभाजन केल्यास या भागाचा विकास होईल .  काँग्रेस नेते अशोक पूजारी म्हणाले, “गोकाक नूतन जिल्हा बनवण्यासाठी हा संघर्ष प्रतीकात्मक बनला आहे. आगामी आठवड्यात सरकारला जागृत करण्यासाठी अधिक तीव्र आंदोलन सुरू केले जाईल. बेळगाव जिल्हा विभाजन केल्यास कन्नड भाषिकांना काहीही तोटा होणार नाही, बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाला आडकाठी न आणता बेळगाव कन्नडवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले

या आंदोलनात ब्रह्मानंद स्वामीजी, डॉ. महांतेश कडाडी, शशिधर देमशेट्टी, अर्जुन पंगन्नवर, बसवराज खानप्पनवर, शंकर गोरोंशी, सदाशिव गुदगळ, निंगप्पा कुरबेट, विश्वनाथ कडकोळ, लक्ष्मी पाटील आणि अजिज मोकाशी यांसह अनेक नेत्यांचा सहभाग होता. गोकाक जिल्ह्याच्या निर्माणासाठी होणाऱ्या संघर्षाला आणखी ताकद मिळाली असून, पुढील काळात यासाठी चालू असलेल्या आंदोलनात आणखी तीव्रता येण्याची शक्यता आहे.

Tags: