Belagavi

बेळगाव तहसीलदार कार्यालयातील लिपिकाची आत्महत्या

Share

बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एका द्वितीय दर्जा लिपिकाने कार्यालयामधील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून त्यामुळे तहसीलदार कार्यालय हादरून गेले आहे.

रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयात मंगळवारी सकाळी द्वितीय श्रेणीतील लिपिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील रुद्रेश उर्फ (रुद्रण्णा) यडवन्नावर (वय ३६) यांनी काल रात्री तहसीलदारांच्या दालनात गळफास घेऊन आत्महत्या केली, कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे

रुद्रण्णा यांची बेळगाव तहसीलदार कार्यालयातून सौंदत्ती यल्लम्मा मंदिर व्यवस्थापन मंडळात बदली झाली. त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे त्यांची बदली रद्द करण्याची विनंती केली होती. याबाबत रुद्रण्णा यांनी सोशल मीडियावर लिहून तहसीलदार कार्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये चर्चा केल्याचे दिसते. तहसीलदार बसवराज नागराळ, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे निकटवर्तीय सोमू आणि अशोक कब्बलीगेर हे माझ्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे मृत रुद्रण्णा यांनी आत्महत्येपूर्वी चिट्ठीत लिहून ठेवले आहे.

आपल्यावर अन्याय झाला असून सर्वांनी एकत्र येऊन लढा असा संदेश दिल्याने रुद्रण्णा यांना तहसीलदार कार्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. या संदर्भात तहसीलदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगण्यात येत आहे. खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून खडेबाजार पोलीस व डीसीपी जगदीश रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आत्महत्येचे कारण तपासानंतर समजेल अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

मृत रुद्रण्णाच्या आईने सांगितले की, आपला मुलगा काल रात्री घरी जेवण करून घराबाहेर पडला आणि झोपायला गेला. यानंतर अचानक आज सकाळी ही धक्कादायक बाब उघडकीस आली.  पतीचा मृतदेह पाहून पत्नीलाही शोक अनावर झाला. त्यांच्या पत्नी देखील महसूल खात्यात कार्यरत असून त्या देखील तलाठी आहेत. घटनेची माहिती मिळताच त्या देखील तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला. मृत रुद्रण्णा यांच्या कुटुंबीयांसहित उपस्थित कर्मचाऱ्यांनाही दुःख अनावर झाले होते.

Tags: