बेळगावमधील शाहूनगर येथे रविवारी रात्री काही अज्ञातांनी औरंगझेबचे फोटो असलेले बॅनर लावल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र स्थानिकांच्या मागणीनुसार पोलिसांनी हस्तक्षेप करत तातडीने बॅनर हटविले आहेत.
रविवारी रात्री काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याने संतापाची लाट उसळली असून रातोरात बॅनर लावणाऱ्या अज्ञात समाजकंटकांना अटक करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे. लावण्यात आलेले बॅनर हटविण्यात यावेत अशी मागणी स्थानिकांनी केल्यानंतर हा प्रकार पोलिसांनी महानगरपालिकेच्या निदर्शनात आणून देत पुढील कारवाई केली. दरम्यान काही तरुणांनी याप्रकरणी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.
शिवाय जर हे बॅनर काढायचे असतील तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बॅनर देखील हटविण्यात यावेत, हिंदू राष्ट्र असा मजकूर असलेले बॅनर हटविण्यात यावेत, असे वादग्रस्त विधान केले आहे. सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या या तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Recent Comments