ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये कोट्यवधी रुपये गुंतवून याच प्रकरणी आर्थिक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर बालकांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अथणी मधील कोहळ्ळी येथील हुलगबाळ रोडवरील आपल्या घरी खेळत असलेल्या स्वस्ती देसाई आणि वियोम देसाई या बालकांचे अपहरण करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघाजणांवर पोलिसांनी गोळीबार करून अपहृत मुलांची सुखरूप सुटका केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. मुलांचे आई – वडील कामानिमित्त बाहेर गेल्याचे हेरून दोन्ही मुलांचे अपहरण करण्यात आले होते.
याप्रकरणी मुलांच्या वडिलांनी अथणी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ याच परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळाला होता. वडील आणि इतर कांही लोकांमधील आर्थिक वादातून मुलांचे अपहरण झाल्याचा पोलिसांचा संशय असून याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी अधिक माहिती दिली आहे.

मुलांच्या वडिलांकडे अपहरणकर्त्यांनी सात कोटी रुपये ऑनलाईन ट्रेडिंगसाठी गुंतविले होते. मात्र सदर व्यक्तीने आपला मोबाईल बंद करून गुंतवणूकदारांना प्रतिसाद दिला नाही. या रागातून चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावातील रविकिरण कमलाकर, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील संभाजी कांबळे आणि बिहारचा शाहरुख शेख यांनी अपहरणाचा कट रचून नंबरप्लेट नसलेल्या कारमधून दोन्ही मुलांचे अपहरण केले. काल अपहरणाची घटना घडल्यानंतर आज शुक्रवारी पहाटे पळवलेल्या मुलांना घेऊन अपहरणकर्ते कारगाडीतून कोहळ्ळी सिंदूर मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी संशयावरून कार गाडी अडवली. यावेळी अपहरणाच्या घटनेचा उलगडा झाला.
संशयित जखमी आरोपी संभाजी कांबळे याला प्रथम अथणी तालुका रुग्णालयात व नंतर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती आज बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी दिली. आज त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी पोलीस कर्मचारी व आरोपींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार अडविल्यानंतर आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. पोलिसांच्या फायरिंगमध्ये अपहरणकर्त्यापैकी एक संशयित जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अथणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अपहृत मुलांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. शिवाय या कुटुंबातील अपहरणाची हि दुसरी वेळ असल्याची माहितीही त्यांनी दिली.


Recent Comments