Belagavi

ऊस उत्पादकांचे साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

Share

बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावून या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या जिल्हाधिकारी, साखर आयुक्त व अधिकाऱ्यांच्या धोरणाचा निषेध करत निजलिंगप्पा शुगर कंपनी येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर ऊस उत्पादकांनी आंदोलन केले.

बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली. मात्र, जिल्हाधिकारी दालनात जिल्हाधिकारी, साखर आयुक्त किंवा वरिष्ठ अधिकारी यांपैकी कोणीही उपस्थित नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शहरातील निजलिंगप्पा शुगर कंपनीतील साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

बैठक बोलावून अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविल्याने संतप्त शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले कि, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार ऐकत नाही. आणि आश्वासनांची पूर्तता होत नाही. सात वर्षांपूर्वी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झाली नाही.

चालू वर्षाचा भाव निश्चित होईपर्यंत कोणत्याही कारखान्याला उसावर प्रक्रिया करू देणार नाही, असा इशारा कर्नाटक शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष बसनगौडा पाटील यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर सम्पर्क साधल्यानंतर अखेर शेतकऱ्यांनी नमते घेत २९ ऑक्टोबर रोजी बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती दिली.

Tags: