राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक द्विशतकी विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राणी चन्नम्मा यांच्या काकती या मूळ गावी जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
राणी चन्नम्मा यांचा इतिहास सर्वदूर पोहोचावा या उद्देशाने विजयोत्सवाच्या द्विशतकी पार्श्वभूमीवर कित्तूर उत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवातून चन्नम्माच्या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व पटवून दिले जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
राणी चन्नम्मा यांच्या इतिहासाला काकती गावाची पार्श्वभूमी आहे. यामुळे या उत्सवाची सुरुवात सालबादनुसार प्रतिकात्मक पद्धतीने काकती येथे होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिले. कित्तूर राणी चन्नम्मा यादेखील वीरांगना होत्या. त्यांनी सवातंत्र्याच्या लढाईत आपले बलिदान दिले. कित्तूर राणी चन्नम्माच्या इतिहासाची सर्वांना जाणीव करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे, आगामी काळात कित्तूरचा इतिहास सांगण्यासारखे कार्यक्रम इतर तालुक्यांमध्येही आयोजित केले जातील. याशिवाय कित्तूर आणि काकतीच्या विकासासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
यावेळी सिद्दू सुनगार, अयप्पा कोलकार, एस.डी.पाटील आदी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी विशेष व्याख्याता म्हणून आलेल्या डॉ.गुरुदेवी हुलेप्पनवरमठ यांनी राणी चन्नम्मांचा इतिहास आणि कर्तृत्व याविषयी सांगितले. काकती हे राणी चन्नम्मा यांचे मूळ गाव असून त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची इथूनच सुरुवात झाली. 280 गावांवर प्रशासकीय अधिकार क्षेत्र असलेल्या कित्तूरने 239 वर्षे राज्य केले. राणी चन्नम्मा यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. राणी चन्नम्मा यांचे धैर्य आज प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे, असे डॉ.गुरुदेवी यांनी सांगितले.
मुक्ती मठाचे श्री शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि काकतीचे उदय महास्वामी यांनी देखील राणी चन्नम्मा यांना आदरांजली वाहून उपस्थितांना आशीर्वचन दिले. या कार्यक्रमास आमदार राजू (असेफ) सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडिकर, हमी प्रकल्प जिल्हाध्यक्षा विनय नवलगट्टी, जिल्हा पंचायत सीईओ राहुला शिंदे, बेळगाव उपविभागीय अधिकारी श्रावण नायक, काकती उत्सव समिती सदस्य, मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
Recent Comments