बेळगाव मनपाच्या नूतन आयुक्तपदी शुभा बी. यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी बेळगावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
बेळगाव महापालिका आयुक्तपदी कार्यरत असलेले अशोक दुडगुंटी यांची बदली झाल्यानंतर आज नूतन आयुक्तपदी शुभा बी.यांची नियुक्ती झाली. माजी आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी नूतन आयुक्त शुभा बी यांना अधिकारपदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी उपायुक्त रेश्मा तालिकोटी, उदयकुमार, लक्ष्मी निपाणीकर, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नूतन आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मावळते आयुक्त अशोक दुडगुंटी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन आयुक्त शुभा बी. यांनी, महापौर, आमदार, नगर सेवकांना विश्वासात घेऊन कर्तव्य बजावण्याचे आश्वासन दिले. तसेच बेळगाव शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील कन्नडसक्तीबाबतही त्यांनी पहिल्याच दिवशी मुद्दा उपस्थित केला असून पहिल्या दिवसापासूनच मराठी भाषिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
कर संकलन शहरी विकासाला पूरक आहे. पायाभूत सुविधा देण्यासाठी कराचा पैसा आवश्यक आहे. कराची थकबाकी 1976 च्या नियमांनुसार भरली जाईल. या ऑपरेशनसाठी विशेष टीम तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुवर्णसौध, बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले दक्षिण कर्नाटकातील लोकांना उत्तर कर्नाटकात येऊन सेवा देण्यासाठी अनुकूल वातावरण असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले
यावेळी बेळगाव महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Recent Comments